पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच : महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नांदेड, दि. 6 ऑक्टोबर : नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदतकार्य हाती घेत आहेत. महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, विष्णुपुरी यांनीही या मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून धान्य किट उपलब्ध करून दिले.

गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे राहेगावला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क जवळपास दहा दिवस होता. या परिस्थितीत नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य सुनिश्चित केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने धान्य किटचे वितरण करण्यात आले.

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजीही राहेगावात धान्य किट वाटप करण्यात आले होते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने १८ सप्टेंबर रोजी १०५, २८ सप्टेंबर रोजी १०२ आणि ३० सप्टेंबर रोजी ५६ रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. महावितरणच्या सहकार्याने गावातील विद्युतपुरवठा पुनर्संचयित करण्यात आला.

धान्य वाटप कार्यक्रमात वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे आणि मारोतराव पाटील इंगळे यांसह महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राहेगावातील नागरिकांनी या कठीण काळात प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या