कर्मवीरांच्या जन्मभूमीतून माणुसकीचा ओलावा !कोल्हापूरच्या ’कर्मवीर प्रतिष्ठान’चा सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत जनजीवन विस्कळीत झाले असताना, कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावातील कर्मवीर प्रतिष्ठान ने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कर्मवीर प्रतिष्ठानने सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे आणि पाथरी या दोन गावांमध्ये जाऊन पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या हस्ते केले.
सोलापूर जिल्ह्यात सिना नदीला आलेल्या महापूरामुळे नदीकाठच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि भुमीहीन लोकांचे जीवन उदवस्त झाले आहे. या पुरग्रस्तांची सामाजिक बांधिलकी जपत कर्मवीर प्रतिष्ठानने तिर्हे आणि पाथरी गावातील एकूण 105 पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक असणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. तिर्हे येथे किट सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी ’कर्मवीर प्रतिष्ठान’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, संकटकाळी जेव्हा मदतीचा हात पुढे येतो, तेव्हा पीडितांना मोठा दिलासा मिळतो. कोल्हापूरसारख्या दुसर्या जिल्ह्यातून येऊन सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्याची ही भावना अत्यंत प्रेरणादायी आहे. कर्मवीर प्रतिष्ठानने केलेली ही मदत निश्चितच मोलाची आहे.
स्थानिक पूरग्रस्तांना नेमक्या कोणत्या वस्तूंची गरज आहे, याचा अभ्यास करून किट तयार करण्यात आले होते. प्रत्येक किटमध्ये तांदूळ, साखर, चहापत्ती, रवा, पोहे, बिस्कीट, मसाला, तिखट चटणी यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. पावसाळ्याच्या दिवसांत आणि पूरानंतरच्या काळात कुटुंबांना काही काळ पुरतील एवढ्या वस्तू या किटमध्ये होत्या, ज्यामुळे पूरग्रस्तांना मोठा आधार मिळाला.
पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळावी यासाठी ’कर्मवीर प्रतिष्ठान’चे सर्व सदस्य गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत पाटील आणि सचिव सचिन नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने मदत निधी जमा करणे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे, त्यांचे वर्गीकरण करून किट तयार करणे आणि सुरक्षितपणे सोलापूरपर्यंत पोहोचवणे या सर्व कामांमध्ये मोठी मेहनत घेतली.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य प्रविण पाचोरे, तुषार शिंगे, अनिल पांडव यांनी प्रत्यक्ष तिर्हे आणि पाथरी गावात उपस्थित राहून वाटप प्रक्रिया यशस्वी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधून, त्यांची विचारपूस करून त्यांना भावनिक आधार देण्याचे कामही या सदस्यांनी केले. यावेळी प्रा. विठ्ठल एडके, जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख लतिफ तांबोळी, हर्षवर्धन क्षिरसागर, अशोक एडके यांनी कर्मवीर प्रतिष्ठानला किट वाटपामध्ये मदत केली.




