माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नामुळे द्राक्ष बागांचे पंचनाम्याचे आदेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. खरीप पिकांसह द्राक्षांसारख्या उत्पादनक्षम फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे संसार डळमळीत झाले आहेत. माढा व बार्शी तालुक्यातील शेकडो द्राक्ष बागायतदारांनी या संकटातून दिलासा मिळावा म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकून राजेंद्र राऊत यांनी तात्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या यातनांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी माढा तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार नितीन कापसे यांनी शेतकऱ्यांसह पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथील तज्ज्ञ डॉ. एस. डी. रामटेके व डॉ. पी. एस. निकुंभ यांनी नुकतीच पाहणी केली असून, त्यांचा अहवाल शासन निर्णयात मार्गदर्शक ठरणार आहे.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार, अतिवृष्टी, पूरस्थिती व हवामानातील प्रतिकूल बदल यामुळे द्राक्ष बागांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे ग्रामीण कृषी समितीमार्फत पंचनामे करून या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या चौकटीत तातडीची मदत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून, हानीग्रस्त द्राक्ष बागायतदारांना थोडासा श्वास घेता येईल. तसेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांची दखल घेतल्याबद्दल, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या