शारदीय नवरात्र महोत्सवात उपवासाच्या अन्नपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी : अन्न व औषध प्रशासनाचा इशारा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून भगर व इतर उपवासाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. मात्र, अशा पदार्थांच्या सेवनामुळे अन्न विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) देसाई यांनी केले आहे.
नवरात्र उपवासाच्या काळात खालील बाबींची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे :
पूर्णपणे शिजवलेलेच अन्नपदार्थ सेवन करावेत. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले पदार्थ टाळावेत, अन्यथा उलटी, जुलाब यासारख्या त्रासाची शक्यता असते.
शिळ्या अन्नाचे सेवन टाळावे. सकाळी बनवलेली भगर संध्याकाळी किंवा रात्री खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.
पॅकबंद व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. पॅकेटवरील उत्पादक तपशील, बॅच नंबर इत्यादी तपासूनच खरेदी करावी.
खुल्या बाजारातील सुट्टे पीठ टाळावे. पॅकबंद भगर स्वच्छ करूनच घरगुती पीठ तयार करावे.
अन्नपदार्थ स्वच्छ वातावरणात व पिण्यायोग्य पाण्याचा वापर करून तयार करावेत.
फलाहारासाठी ताजी, योग्य प्रकारे साठवलेली व पिकवलेली फळेच निवडावीत.
दुध व दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात साठवलेले आहेत याची खात्री करूनच खरेदी करावी. (बासुंदी, रबडी, श्रीखंड, दही इ. फ्रिजमध्ये ठेवावेत.)
अन्न विषबाधा टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी.
नवरात्र महोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असला तरी आरोग्यदृष्टीनेही सजग राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना व सेवन करताना वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.




