शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शुभारंभ

0

इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्राला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यादृष्टीने शाहू स्मारक भवन येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी तीन दिवस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्घाटन प्रसंगी आवाहन केले.

भारत सरकार, सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य प्रमुख महोत्सव शाही दसरा कोल्हापूरचा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथे पहिल्या मजल्यावरील सभागृहात हे प्रदर्शन आयोजित केले आहे. शुभारंभ प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवकालीन इतिहास हा श्रध्देसमवेत प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणातील ही महत्वाचे टप्पे असून एक प्रकारे ही आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक शक्तीस्थळ आहेत. या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाला सातत्याने समाजापर्यंत पोहचविण्याची नितांत गरज असून यातून सामाजिक शांतता व स्वास्थ्य अधिक दृढ होते. याच हेतूने शिवशस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती लोकांच्यापर्यंत जाईल यासाठी शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आयोजन केले आहे.

शिवकालीन शस्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. तलवारीचे विविध प्रकार, ब्रिटिश तलवारी, दांड पट्टा, बाणा, भाला, पगड्या, कोयता, शिरस्त्राण, ढाल, तोफ गोळे, अश्मयुगीन दगडी हत्तार, दस्तान, कासवाच्या पाठीची ढाल, चामडी ढाल, चिलखत, वाघ नखे, कट्यार, गुप्ती, कुकरी, खंजीर, हंटर बंदूक, त्रिशूल, कोयता, खंजराली आणि कुऱ्हाडीचे विविध प्रकार या ठिकाणी त्यांच्या माहितीसह पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन शिवकालीन शस्त्र वस्तू संग्राहक संदीप ऊर्फ नाना सावंत यांच्या शिवगर्जना, प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या