बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान माजी आमदार राऊत नुकसानीची पहाणी करताना
चांदणी नदीला महापूर; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, जनावरे वाहून, शेतकरी अडकले
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला असून बेलगाव, मांडेगाव, आगळगाव, धसपिंपळगाव, खडकलगाव, देवगाव, कांदलगाव आदी गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे कांदा, ऊस, सोयाबीन, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतातील सुपीक माती देखील वाहून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बेलगाव येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या जनावरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असून काही जनावरे वाहून गेली आहेत. तर खडकलगाव येथील शेतकरी रामभाऊ करडे हे तब्बल 10 तास पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. बार्शी तहसील कार्यालय, तालुका पोलीस ठाणे व बार्शी नगरपरिषदेच्या अपत्कालीन पथकाने तत्परता दाखवत अखेर 10 तासानंतर करडे यांची सुटका करण्यात यश आले.
दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, जलसंधारण विभागाचे जगताप यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा देत प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी सूचना केल्या.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रशासनाला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे तातडीने करून त्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.




