बनावट प्यूमा शूज आणि चप्पल प्रकरणी पोलिसांची कारवाई १.८२ लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त, एकाला अटक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील कुर्डूवाडी रस्त्यावरील शौर्य हॉटेलच्या मागील गोदामात बनावट प्यूमा ब्रँडच्या उत्पादनांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकला. या कारवाईत ७६२ बनावट शूज आणि चप्पल जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत १ लाख ८२ हजार ४०० रुपये आहे. गोदाम मालक इफ्तेकार अब्दुल गफार शेख (वय ४०, रा. बार्शींगे प्लॉट, बार्शी) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ आणि ६५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्यूमा कंपनीच्या कॉपीराइट आणि ट्रेडमार्क संरक्षणासाठी दिल्लीतील एलुडिकेशन अॅडव्होकेट अँड सॉलिसिटर या कंपनीकडून महाराष्ट्रातील कामकाज पाहणारे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहनसिंग देवरा (वय ३६, रा. बिरोलीया, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) यांनी ही तक्रार नोंदवली. देवरा यांच्या माहितीनुसार, इफ्तेकार शेख बनावट प्यूमा लोगो असलेली उत्पादने विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचे समोर आले. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी बार्शी शहर पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला.
पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक माकणे, पोलीस हवालदार माने (बकल नं. १६६७) आणि पोलीस शिपाई भांगे (बकल नं. ९१८) यांच्या पथकाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह (सत्तार मूनाफ शेख, साहीद सादीक पटेल, किशोर वागाराम चौधरी) दुपारी २.४५ वाजता स्टेशनमधून निघून जैन मंदिराजवळील परिसरात पोहोचले. तेथे पळत जाणाऱ्या इफ्तेकार शेखला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याने गोदाम स्वतःचे असल्याचे कबूल केले.
गोदामाची झडती घेतली असता, १० खाकी बॉक्सेसमध्ये विविध रंग आणि आकारांच्या ६६२ बनावट प्यूमा चप्पल (प्रत्येकी २०० रुपये) आणि दोन नायलॉन पोत्यांमध्ये १०० बनावट प्यूमा नायट्रो शूज (प्रत्येकी ५०० रुपये) सापडले. शेखकडे खरेदीची पावती नसल्याने हा माल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पंचांसमक्ष प्रत्येक प्रकारचे एक-एक सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले, तर उर्वरित माल प्लास्टिक पोत्यात भरून सील करून जप्त करण्यात आला. छापा दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान पूर्ण झाला.
देवरा यांच्या जबाबानुसार, हे प्रकरण कॉपीराइट उल्लंघनाचे असून, बनावट उत्पादनांमुळे कंपनीला मोठा तोटा होत आहे. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.




