साहित्य संस्कृती जपण्यासाठी तरुण पिढीने पुढे येण्याची गरज- उ‌द्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर : साहित्य व नाट्यकलेच्या माध्यमातून समाज जागृतीचा प्रभावी संदेश देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरुण पिढीने मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करत नव्या कल्पनाशक्तीने साहित्य संस्कृती जपण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सावेडी उपनगर आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य-नाट्य संमेलन २०२५ च्या समारोप सोहळ्याप्रसंगी मंत्री डॉ. सामंत बोलत होते. यावेळी जयंत येलूलकर,डॉ. प्रशांत भालेराव, ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, गौरी देशपांडे, विश्वासराव आठरे, चंद्रकांत पालवे, मकरंद कुलकर्णी, डॉ. गोपाळ बहुरुपी आदी उपस्थिती होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेच्या उद्धारासाठी, समृद्धीसाठी, मराठी भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषेची बृहन्मराठी मंडळे देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये असणे आवश्यक आहेत. तसेच मायमराठीला सातासमुद्रापलिकडे नेण्यासाठी परदेशातही बृहन्मराठी मंडळे आवश्यक आहेत. पुढच्या वर्षापर्यंत जगभरातील ५० देशात बृहन्मराठी मंडळे निर्माण करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

साहित्य आणि नाट्यक्षेत्र एक करत उत्तम अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य निर्माण होत नाही तोपर्यंत रंगमंचावर नाटक, चित्रपट निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. साहित्य संस्कृती जपण्यासाठी अशी संमेलने अत्यंत उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यामध्ये असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठीमधून शिक्षण देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर यांनी दिलेल्या मराठीला जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. युवा पिढीने देशासाठी, आपल्या भाषेसाठी आपण काय करु शकतो याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. सामंत यावेळी यांनी सांगितले. समारोप सोहळ्याचे प्रास्ताविक जयंत येलूलकर यांनी केले. विश्वास आठरे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी साहित्यिकांचा डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या