सोलापूर जिल्हा क्षयरोग मुक्ततेच्या दिशेने…. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा ‘नि-क्षय मित्र’ संकल्पनेला सक्रिय पाठिंबा, स्वतःही बनले नि-क्षय मित्र’

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. १० : सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी ‘नि-क्षय मित्र’ ही संकल्पना ९ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या अंतर्गत व्यक्ती, संस्था आणि अधिकारी क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन पोषण, तपासणी व मानसिक आधार देतात. सोलापूर जिल्हा क्षयरोग मुक्ततेच्या दिशेने महत्वपूर्ण कामगिरी करत आहे.

आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः नि-क्षय मित्र बनून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी टीबी मुक्त भारत अभियानाचे राज्य सल्लागार संजीव कुमार मिश्रा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे उपस्थित होते.

सन २०२४ मध्ये १९९ ग्रामपंचायतींना टीबी मुक्त दर्जा प्राप्त: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी क्षयरोगमुक्ततेच्या दिशेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. सन २०२३ मध्ये ५३ ग्रामपंचायती तर २०२४ मध्ये तब्बल १९९ ग्रामपंचायतींनी ‘टीबी मुक्त’ दर्जा प्राप्त केला आहे. ही कामगिरी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाजातील विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी सरासरी ३२०० ते ३५०० क्षयरोग रुग्ण खाजगी व सरकारी उपचारांखाली असतात. हा आजार विशेषतः कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतो—जसे की वृद्ध, डायबेटीस, डायलिसिस, कॅन्सर, एचआयव्हीग्रस्त, कुपोषित, व्यसनाधीन आणि पूर्वी टीबीग्रस्त व्यक्ती. गरिबी आणि आजार यांच्यातील परस्पर संबंधामुळे हा आजार एक सामाजिक आव्हान ठरतो.

या कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी मॉलिक्युलर डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून, तालुका स्तरापर्यंत नेट तपासण्या उपलब्ध आहेत. उपचार संपूर्णपणे देखरेखीखाली आणि मोफत असून, सरकारी तसेच नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध आहेत. एमडीआर (मल्टी ड्रग रेझिस्टंट) टीबी रुग्णांसाठी जून २०२५ पासून उच्च दर्जाचा BPaLM औषध उपचार मोफत दिला जात असून, त्याचा सरासरी खर्च ३० लाख रुपये इतका आहे.

संपर्कातील व्यक्तींना टीबी प्रतिबंधात्मक औषधोपचार दिले जातात. याशिवाय, नि-क्षय पोषण योजना अंतर्गत सरकारी व खाजगी नोंदणीकृत रुग्णांना दरमहा ₹१००० पोषण सहाय्य एक नोव्हेंबर २०२४ पासून दिले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या