सामाजिक न्याय भवन येथे भटके विमुक्त दिन साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि. १० : भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. या समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य, परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबवून हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून उपस्थित होते. यावेळी ओमप्रकाश नगराळे यांनी शासनाच्या भटके-विमुक्त समाजासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. भारत जाधव यांनी भटके विमुक्त समाज परंपरा आणि स्थिती या विषयावर मार्गदर्शन करतांना या समाजाचा शौर्यपूर्ण इतिहास, कलात्मक परंपरा आणि सद्याच्या समस्यांची मांडणी केली. सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी विद्यार्थ्यांना जात वैद्यता पडताळणी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले.
भटके विमुक्त दिवसानिमित्त जिल्ह्यातील शाळा, वसतिगृहे, आश्रमशाळा येथे भटके विमुक्त समाजाचा इतिहास, समाजाची परंपरा व सद्यस्थिती या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रफुल गणपत भोयर, द्वितीय केसरी शरद गाडवे व तृतीय क्रमांक मयुरी देवेंद्र राठोड यांना मिळाला. तसेच सेटलमेंट व १९५२ गुन्हेगार कायदा या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी बावणे व द्वित्तीय क्रमांक दिव्या जुनघरे यांनी मिळविला.
तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जिवनावर आधारीत निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक जानवी दादाराव मोहोरे, द्वितीय स्वाती संजय राठोड, तृतीय नव्या नारायण गोरे यांनी मिळविला. तसेच हरीष विश्वजित जाधव, सार्थक ज्ञानेश्वर कुडवे, प्रणाली नामदेव राठोड या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे भेट देण्याकरीता स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये कल्याणी सखाराम राठोड, ईश्वारी कैलास जाधव, गौरी पंकज काटकर व मयुरी देवेंद्र राठोड, सचिन किसन राठोड, हिमांशु किशोर आडे, जय नागोराव दिवसे व योगेश शंकर राठोड या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले. चित्रे, भिंतीचित्र पोस्टर प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली कॅनव्हस पेंटींग प्रदर्शनाकरीता ठेवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमुल्य, परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले.
भटके विमुक्त दिवसानिमित्त आयोजित शिबिरामध्ये ३५२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, २२ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी, ७५ विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले. तहसिल कार्यालयामार्फत जातीचे दाखले काढण्याचे शिबिर घेण्यात आले. तसेच जात वैद्यता पडताळणी प्रमाणपत्र व महामंडळांच्यावतीने आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन ज्योत्सना संदीप पवार यांनी केले. आभार गजेंद्र राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी निरीक्षक गजेंद्र राऊन, अभिजित घोडे, योगेश बडवाईक, स्मिता झलके, तुषार कोलकर, सतिश वानखेडे, सचिन ढगे, सुनंदा राठोड, प्रिती कांबळे व सर्व कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.




