स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आयएएस अधिकारी कौशल्या एम. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी आदी उपस्थित होते. श्रीमती कौशल्या यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने व्यक्तिमत्त्वामध्ये अमुलाग्र बदल होतो. संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असताना केवळ एक हजार विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी होत असते. त्यामुळे स्पर्धाही आपल्याला आपल्याशी करावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवेळी परीक्षेची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लागत असतो. त्यामुळे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच निबंध किंवा इतर विस्तृत प्रश्नांची उत्तरे देताना भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. यासोबतच मुख्य परीक्षा लक्षात घेता विषयांची निवडही महत्त्वाची ठरते. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयाचे ज्ञान आकलन करणे सोपे आहे, अशा विषयांची निवड करणे फायद्याचे ठरते. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे ही एक लांब प्रक्रिया असून यामध्ये विद्यार्थ्यांचा संयम महत्त्वाचा ठरतो. चाळणी आणि मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत यातून यशस्वी झालेल्यांनाच शासकीय सेवेची संधी मिळते. यातील एकाही पायरीवर अपयश आल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अभ्यासाचे नियोजन करून ही परीक्षा द्यावी, असे आवाहन केले.
श्रीमती सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत माहिती दिली. यश मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक असून मेहनत घेण्याची मनाची तयारी असावी लागते. विविध विषयाचा अभ्यास करताना स्वतःचे नोट्स स्वतः काढणे, तसेच व्हिज्युअल तयार करणेही आवश्यक असल्याचे सांगितले. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांसोबतच चालू घडामोडी या गोष्टीही महत्त्वाच्या असल्याने यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी गत वर्षातील परीक्षांची प्रश्नपत्रिका समजावून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर तयारी करण्यासाठी आठवी ते बारावीपर्यंतची पुस्तके बारकाईने वाचून त्यातील नोट्स काढणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाला पूरक ठरेल यासाठीच समाज माध्यमांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी येरेकर यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढावा, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षांमधील प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे युवकांना मार्गदर्शन ठरतील. स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यात यावी. यातून युवकांना फायदाच होणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विषयांची निवड ही संबंधित विषयाची पुस्तके वाचून त्यातून होणाऱ्या ज्ञानाची आकलन करून निवडावी. विस्तृत उत्तरे लिहिण्याच्या प्रश्नांमध्ये चालू घडामोडींचा उपयोग होत असल्याने तयारी करण्याच्या सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रे वाचण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.




