हैद्राबाद गॅझेटच्या आधारे बार्शी तालुक्यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ दाखले द्यावेत – मराठा समाजाची तहसीलदारांकडे मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करणारे मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर राज्य शासनाने हैद्राबाद व सातारा संस्थानच्या गॅझेटला मान्यता देऊन मराठा समाजातील पात्र घटकांना ‘कुणबी’ दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील हैद्राबाद संस्थानातील गावे ओळखून तेथील मराठा समाजाला त्वरित ‘कुणबी’ दाखले द्यावेत, अशी मागणी येथील मराठा समाजाने तहसील प्रशासनाकडे केली आहे.
बार्शी तालुक्यातील शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव भोईंजे, शेंद्री, वांगरवाडी, तावरवाडी, बोरगाव, इर्ले, रऊळगाव, मुंगशी, सासुरे ही गावे पूर्वी हैद्राबाद संस्थानाच्या अखत्यारीत होती. त्यामुळे या गावांतील मराठा बांधवांना ‘कुणबी’ म्हणून ओळख देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी बार्शी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्याकडे मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव तहसील कार्यालयात उपस्थित होते. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणापासून वंचित आहे, त्यामुळे सरकारने तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी आणि संबंधित गावातील पात्र नागरिकांना ‘कुणबी’ दाखले द्यावेत.
सरकारच्या नव्या धोरणानुसार, ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधारे ‘कुणबी’ म्हणून ओळख मिळाल्यास, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा थेट लाभ मिळू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.




