अपहरण झालेल्या व्यक्तीची १२ तासांत सुटका, ६ आरोपींना अटक, बार्शी शहर पोलीसांची दमदार कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी अपहरण झालेल्या एका व्यक्तीची अवघ्या १२ तासांत सुटका करून सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा होत असून, अपहरणकर्त्यांकडून वापरलेली ५ लाख रुपयांची इर्टिगा कारही जप्त करण्यात आली आहे.
घटना ४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लातूर रोडवरील एसआर पेट्रोल पंपाजवळ, स्वयंवर मंगलकार्यालयासमोर घडली. लक्ष्मी नगर, बार्शी येथील रहिवासी शारदा राजेंद्रसिंह चंदेले (वय ५३) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या जावयाला, संतोषसिंग देविसिंग चंदेले (वय ३४, रा. उमानिवास, हिंगोली नाका, हुलासिंग गोविंद नगर, नांदेड) यांना चार अज्ञात व्यक्तींनी इर्टिगा कार (क्रमांक MH-22 AW-8488) ची चावी हिसकावून जबरदस्तीने अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी संतोषसिंग यांना गुप्तपणे ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४० (३), (३)५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ७३७/२०२५ नोंदवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून बार्शी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रवाना केले. या पथकात उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्यासह पोलीस हवालदार अमोल माने, पोलीस काँस्टेबल अंकुश जाधव, सचिन नितनात, चेतन झाडे यांचा समावेश होता. अपहृत व्यक्तीशी संपर्क होत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या पत्नी आणि वडिलांकडून माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपहरणकर्ते नांदेडच्या दिशेने जात असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहृत व्यक्ती आणि आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी अपहरणात वापरलेली इर्टिगा कार (क्रमांक MH-22 AW-8848) ही जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत: (१) मीरा नंदकुमार धुळगुंडे, (२) नंदकुमार गणपती धुळगुंडे, (३) यशवंत नंदकुमार धुळगुंडे (तिघे रा. सादलापूर, ता. पालम, जि. परभणी), (४) बालाजी खंडुराव सुर्यवंशी (रा. साखळा प्लॉट, परभणी), (५) गोविंद माधवराव सायंगुडे (रा. संतकबीर नगर, वांगी रोड, परभणी), (६) बालाजी अशोक शिंदे (रा. प्रसावत नगर, परभणी).
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, हवालदार अमोल माने (१६६७), काँस्टेबल जाधव (२१११), नितनात (११९५), फत्तेपुरे (२१३२) आणि सायबर पोलिस ठाण्याचे काँस्टेबल रतन जाधव यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब जाधव करीत आहेत.




