ऑगस्ट महिन्यातील 9 निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : महानगरपालिका सेवेतून ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणा-या 9 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, विधी अधिकारी अभय जाधव, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारीवृंदास शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इतर अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी ज्या संस्थेत व वास्तूत आपण आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ घालवतो, त्या वास्तूशी, तिथल्या साहित्याशी, तिथल्या माणसांशी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. त्यामुळे सेवानिवृत्तीचा क्षण हा यशस्वी कारकीर्द झाली या आनंदाप्रमाणेच उद्यापासून आपण या सगळया गोष्टींपासून दुरावणार याची खंत देणारा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या सोशल मिडीया प्रेमी युगात माणसे व्यस्त झाली आहेत मात्र संवाद कमी झाला आहे. त्यामुळे आजच्या जगात सेवानिवृत्तीनंतर एकटेपणा घालविण्यासाठी आपल्या आवडत्या माध्यमातून व्यक्त होत रहा असे आवाहन त्यांनी केले.
त्यांच्याप्रमाणेच महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनीही आपली कविता सादर करीत यापुढील आयुष्य कुटूंबियांना सोबत घेऊन आनंदाने व्यतीत करा असे सांगितले. विधी अधिकारी अभय जाधव व काही अधिकारी, कर्मचारी यांनीही आपल्या निवृत्त होणा-या सहका-यांसमवेत काम करतानाचे अनुभव सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणा-या लेखा अधिकारी सविता परदेशी, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा राउुत व काशिनाथ गोलवड आणि केवला राठोड, मुख्याध्यापक सुरेखा माळी, प्राथमिक शिक्षक वृषाली भोसले, आर्टिस्ट कम फोटोग्राफर गिरीश निगडे, वाहनचालक राजकुमार जगताप, सफाई कामगार गणपत कदम अशा 9 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.




