शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

समाज कल्याण अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. या संधीचे आपण सोने करावे, असे आवाहनही शिरसाट यांनी यावेळी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या