भीमा नदीला १ लाख ४६ हजाराचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पंढरपूर : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे .धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून ९१ हजार ६०० क्यूसेक्स तर वीर धरणातून ५४ हजार ७६० क्यूसेक्स असा एकूण १ लाख ४६ हजार ३६० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता संगम येथून १ लाख २० हजार ६९५ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे तर चंद्रभागा नदी पात्रातून ६० हजार २४७ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे.उजनी व वीर धरण घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक (Inflow) नुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये मध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. तसेच पाणी पातळी वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

भीमा व नीरा नदीमधून मोठ्या पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे त्यामुळे नदीतील कोल्हापूर पद्धतीचे सर्वच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. बंधारे पाण्याखाली गेलेल्यावर बॅरेकेट लावून वाहतुकीसाठी बंद करावेत.अशा सूचना तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना दिलेल्या आहेत.

नगरपालिका प्रशासन सज्ज

उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीला उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झालेला आहे त्यामुळे शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी तसेच पूर परिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून. स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व स्वयंसेवी संस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या