कंत्राटदार संघटनांच्या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा जाहीर पाठिंबा : चेतन भाऊ नरोटे
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय विभागांतर्गत विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची थकीत देयके तातडीने मंजूर करण्यासाठी राज्यभरात कंत्राटदार संघटनांच्या वतीने मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, मजूर सहकारी संस्था तसेच सर्व कंत्राटदार संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटदारांची अंदाजे ८९ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून महायुती सरकारने याकडे उघडपणे दुर्लक्ष केले आहे. परिणामी राज्यातील बहुतांश विकासकामे ठप्प झाली असून अभियंते, कंत्राटदार, मजूर संघटना, वाहतूकदार व रोजंदारी कामगारांच्या लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या करण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला होता, ही घटना शासनाच्या असंवेदनशीलतेचे भयावह उदाहरण आहे. म्हणून प्रलंबित देयकांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा दिला.
या आंदोलनाच्या वेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, मा. नगरसेवक विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, सचिन गुंड, संजय गायकवाड, शंकर नरोटे, पृथ्वीराज नरोटे, सुनील सारंगी, गणेश वड्डेपल्ली, सौरभ साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




