शेतकरी बांधवांनो घाबरू नका, शासन आपल्या पाठीशी आहे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम, दि.१८ ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचे, रस्त्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना धीर देत एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, शेतकरी बांधवांनो घाबरू नका. शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे सादर केले जातील. कोणत्याही शेतकऱ्याला वंचित राहू दिले जाणार नाही.
तसेच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात मदत कार्य गतीने सुरू असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा आणि प्रशासनाशी सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वतीने तातडीने दिलासा मिळावा यासाठी सर्व विभाग सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.




