अवयवदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

कोल्हापूर : जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया, असे आवाहन करीत त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील 117 पैकी 52 उपस्थित अवयवदात्यांना व त्यांच्या नातेवाइकांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अवयवदात्यांचा व त्यांच्या नातेवाइकांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून, उदात्त विचारांनी अवयवदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जावा. या महान दानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अवयवदात्यांच्या कुटुंबीयांनी दर्शवलेल्या सामाजिक बांधिलकीचे आणि धाडसाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. सामाजिक कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आपले अनुभव सांगून अवयवदानासाठी प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील नऊ हजारहून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. मी स्वतः 3 ऑगस्ट रोजी प्रथम अवयवदानाचा फॉर्म भरून महाराष्ट्र राज्यात अवयवदानाच्या मोहिमेला सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.

अवयवदान पंधरवडा मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात एक चळवळ म्हणून राबविली गेली. राज्यातील सर्व विभागांतील अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरले आहेत. त्यासाठी सोशल मीडिया जनजागृती मोहीम, अवयवदानावरील ऑनलाइन व्याख्याने, शाळा, माध्यमिक विद्यालये, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी प्रसिद्धी करण्यात येत आहे.

समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी, यासाठी आरोग्य विभागामार्फत क्यूआर कोड आणि गूगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या