दुर्लक्षितांना सन्मानाचा मान — वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची अनोखी संकल्पना

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी उदाहरण ठेवले. ध्वजारोहणाचा मान यावेळी ना राजकीय नेत्यांना, ना मान्यवरांना — तर तो दिला गेला समाजातील खऱ्या अर्थाने दुर्लक्षित घटकांना या विशेष उपक्रमांतर्गत आश्रम शाळेत शिक्षण घेणारे पारधी समाजातील दोन विद्यार्थी — एक मुलगा व एक मुलगी — तसेच वर्षानुवर्षे वैराग पोलीस ठाण्यात साफसफाईचे काम करणारे एक समर्पित दांपत्य — अशा चौघांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
दुर्लक्षित समाजातील मुले आणि स्वच्छतेची सेवा करत आयुष्य घालवणारे हे कर्मचारी दांपत्य यांना दिलेला हा सन्मान केवळ एक समारंभ नव्हता, तर सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेश देणारी प्रभावी कृती होती.
पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दाखवून दिलं की, सन्मान केवळ पद, पैसा किंवा प्रतिष्ठेला नसतो, तर तो प्रत्येक समाजघटकाला मिळायला हवा. त्यांच्या या संकल्पनेमुळे वैराग पोलीस ठाण्याने महाराष्ट्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.



