शेतकऱ्यांच्या खात्यात ९२१ कोटींची थेट भरपाई; पंतप्रधान पिक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम, दि .११ ऑगस्ट : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील रखडलेली नुकसान भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एकूण ९२१ कोटी रुपये सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. पिक विमा योजनेअंतर्गत दावा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काही तांत्रिक कारणांमुळे ही रक्कम रखडली होती. आता हा अडथळा दूर झाला असून सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल.
या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा आर्थिक आधार महत्वाचा ठरेल. खरीप हंगामाच्या सुरुवातीला मिळणारी ही रक्कम त्यांना पुन्हा उत्पादन प्रक्रियेत उभारी देईल, असेही भरणे यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री भरणे यांनी यासाठी संबंधित विमा कंपन्या, बँका आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.




