संपूर्णता अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
कारंजा तालुक्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.४ : नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कारंजा तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय सन्मान समारोह कारंजा येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, नीती आयोगाच्या प्रतिनिधी मुग्धा नारकर आणि जिल्हास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपुर्णता अभियानात कारंजा तालुक्याने सहा पैकी चार निर्देशांकांमध्ये शंभर टक्के संपृक्तता साध्य केली. या उल्लेखनीय यशासाठी गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांना नीती आयोगाने कांस्य पदक देऊन गौरविले. सदर पदक पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, तालुक अधिकारी कृषी अधिकारी मंगेश पंधरे, आकांक्षी तालुका फेलो अपूर्व पिरके, विस्तार अधिकारी, उमेद तालुका व्यवस्थापक, तसेच आशा, एएनएम, अंगणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आकांक्षा हाटचे उद्घाटन; बाजारपेठेची संधी
‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप देत, तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ‘आकांक्षा हाट’ या विशेष दालनाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे आणि आ.सुमित वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांनी दुग्धजन्य पदार्थ, पापड, लोणचं, लाकडी हस्तकला वस्तू, मोरिंगा पावडर, विविध मसाले, अंगणवाडी प्रकल्पांचे पौष्टिक खाद्यपदार्थ, माहितीपर स्टॉल्स तसेच विविध बँकांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.




