मोतिबिंदू शिबिरातील प्रत्येक रुग्णांवर होणार मोफत व उत्तम उपचार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
पुलगाव येथे मोतिबिंदू विरहीत शिबिराचे उद्घाटन, शिबिरास देवळी तालुक्यातील रुग्णांचा प्रतिसाद
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याला मोतिबिंदू मुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियान राबवितो आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या या शिबिरांना रुग्णांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी देखील वाढली आहे. जिल्ह्यात शिबिरांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उत्तम दर्जाचे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानांतर्गत पुलगाव येथे आयोजित देवळी तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. राजेश बकाने, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, सुनील गफाट, संजय गाते, मिलिंद भेंडे, निलेश पोहेकर आदी उपस्थित होते.
कोविडनंतर अनेक नवीन आजार पुढे आले. कोविडसह इतर विविध आजारांवर विनामुल्य उपचार, शस्त्रक्रिया करता याव्या यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत ही अतिशय क्रांतिकारी योजना आणली. यामुळे पाच लाखांपर्यंत उपचार आता विनामूल्य होत आहे. जिल्ह्यात नागरीकांना विनामुल्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी आपण मोतिबिंदूसह दंत व इतरही आजाराच्या तपासण्या करतो आहे. तपासणीनंतर या रुग्णांवर खाजगी दवाखान्यात देखील उपचार केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे राज्यभर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून जमा झालेल्या रक्त पिशव्यांनी विश्वविक्रम केला आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
आ. राजेश बकाने यांनी पुलगावच्या शिबिराचे अतिशय उत्तम नियोजन केले आहे. हजारो रुग्णांना शिबिराचा लाभ होणार आहे. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णांचा वैयक्तिक पाठपुरावा करण्याच्या सूचना मी केल्या आहे. रुग्णांवर पुर्ण उपचार होईपर्यंत आरोग्य विभाग रुग्णांच्या संपर्कात राहील. अभियानासाठी जिल्ह्यातील खाजगी डॅाक्टर्स उत्तम सहकार्य करत आहे. आशा स्वयंसेविका अभियान गावोगावी रुग्णांपर्यंत पोहोचवित आहे, त्यांचे अभिनंदन करतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांची अडचण सोडविण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. नागरिकांनी देखील त्यांच्यासाठी असलेल्या योजना समजून घेत त्यासाठी अर्ज केले पाहिजे, असे ते म्हणाले.
पुर्ण उपचार होईपर्यंत रुग्णांच्या संपर्कात राहू – आ. राजेश बकाने
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ. राजेश बकाने म्हणाले, रुग्णसेवा परमेश्वर सेवा आहे, असे समजून आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी काम करतो आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी वर्धा येथून सुरु केलेले अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. हजारो रुग्णांना याचा फायदा होणार आहे. पुलगाव येथील शिबिरात तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णांच्या शिबिरानंतर त्यांचे पुर्ण उपचार होईपर्यंत संपर्कात राहू, असे आ. बकाने म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिरस्थळी तपासणीसाठी तज्ञांची 54 पथके
सुरुवातीस पालकमंत्री व मान्यवरांची फित कापून शिबिराचे उद्घाटन केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शिबिरस्थळी लावण्यात आलेल्या रुग्ण तपासणी, चष्मे वाटप, औषध वितरण व विविध दालनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तपासणी करत असलेल्या रुग्णांशी संवाद देखील साधला. शिबिरस्थळी नोंदणी, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्र तपासणी, लहान मुलांची तपासणी, सामान्य रुग्ण तपासणी, असंसर्गजन्य आजार तपासणी, स्त्री व वंधत्व, दंतरोग, ईसीजी, कर्करोग, त्वचा, कान नाक घसा, रक्त तपासणी तसेच औषधी व चश्मे तपासणीसाठी एकून 54 पथके नेमण्यात आली होती. तज्ञ डॅाक्टरांच्या नेतृत्वात या पथकांनी रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत शस्त्रक्रियेची आवश्यक्ता असलेल्या रुग्णांवर विनामुल्य शस्त्रक्रिया केली जातील. शिबिरात अवयवदान दालन देखील ठेवण्यात आले होते. या ठिकाणी काही व्यक्तींनी अवयवदानाचे संमतीपत्र दिले.
किसान विकासपत्र व चष्मे वाटप
यावेळी जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग निधीतून दिव्यांग विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे तर काही रुग्णांना चश्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री.लोखंडे यांनी केले. संचलन व आभार डॅा.प्रशांत वाडिभस्मे यांनी केले. शिबिरास पुलगाव व संपुर्ण देवळी तालुक्यातील रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कारंजा येथील शिबिरास आज मुख्यमंत्री भेट देणार
एक पाऊल मोतिबिंदू विहरीत वर्धा अभियानांतर्गत वर्धा, हिंगणघाट, आर्वी व पुलगाव असे चार शिबिर पार पडले आहे. उद्या दि.3 ऑगस्ट रोजी कारंजा येथे पाचवे तालुकास्तरीय मोतिबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहे.




