पंढरपुरात अवैध खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्सवर कारवाई; एफआयआर दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : तालुक्यातील कासेगाव येथील मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्स एलएलपीवर अवैध खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक ३० जुलै २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजता छापा टाकला. यावेळी मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्सवर खत (नियंत्रण) आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
प्रमुख उल्लंघन :
१. परवान्याशिवाय आणि केंद्र सरकारच्या iFMS प्रणालीवरील आयडीशिवाय अवैध मार्गाने कच्चा माल खरेदी करून संशयित मिश्र खतांचे उत्पादन आणि विक्री.
२. इतरत्र उत्पादित माल दुसऱ्या विक्रेत्याच्या बॅगमध्ये भरून अवैध विक्री.
३. खरेदी, विक्री, उत्पादन आणि वितरण यासंबंधी अद्ययावत नोंदी न ठेवणे.
४. स्वतःच्या यंत्रसामग्री बंद असताना बाहेरून आणलेला माल (वाहन क्रमांक MH09 CU8407) गोदामात उतरवून स्वतःच्या आणि इतर परवानाधारकांच्या बॅगमध्ये भरताना आढळणे.
५. १०:२०:२० (३०९ गोण्या), १८:१८:१० (१०२ गोण्या), २०:२०:०० (२१६ गोण्या) आणि १८:१८:१० (९२ गोण्या) अशा ५० किलोच्या एकूण ७१९ गोण्यांचा साठा (किंमत ११,३३,८५० रुपये) आणि कोणताही मजकूर नसलेल्या ७०७ गोण्यांचा अवैध साठा आढळून आला. या साठ्यावर विक्रीबंदी आदेश देण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान, हरिदास हावळे (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) यांच्या नेतृत्वाखालील पथकात सावंत (कृषी अधिकारी, माळशिरस), बोंगे (कृषी अधिकारी, मंगळवेढा) आणि सुमित यलमार (कृषी अधिकारी, पंढरपूर) यांचा समावेश होता. तपासणीत शेतकरी आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या या अवैध कृत्यांचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्सचे साळुंखे आणि जाधव यांच्याविरुद्ध दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर (क्रमांक ०६११) दाखल करण्यात आला आहे. खत (नियंत्रण) आदेश १९८५ च्या खंड ३(३), ४, ७, ८, १२, १३(१)(a), १३(२), १९(C)(II)(III), २४, ३५(१) आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम २, ३, ७ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांकडून सुरू आहे.




