शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.९ : खरीप हंगाम आता ऐन मध्यावर आला आहे. आताच शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, तेव्हा बॅंकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या पीक कर्जाचे नुतनीकरण करुन बॅंकांना सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन व बॅंका मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’, असे अभियानही जिल्ह्यात सुरु केले आहे. दि.३ ते १० जुलै दरम्यान हे अभियान जिल्ह्यातील ३७५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चित्ते- पिंपळगाव व चित्तेगाव या ग्रामपंचायती मार्फत चित्तेगाव येथे आयोजीत कर्ज मेळाव्यास उपस्थित होते.

चित्ते पिंपळगाव सरपंच पांडुरंग सोनोने, चित्तेगाव सरपंच सरला सुदाम गावंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, तहसिलदार कैलास वाघमारे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, मंडळ अधिकारी ए.एल. सुरपाम, ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप, वंदना खेडकर, कृषी सहाय्यक मंजुषा काचोळे तसेच शेतकरी उपस्थित होते.

यंदा (सन २०२५ साठी) जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ७७० खातेदारांना १५९६ कोटी ६३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६७० कोटी ५५ लक्ष रुपये इतके कर्ज ८६ हजार ६९७ शेतकऱ्यांना वाटप झाले होते. म्हणजेच ४२ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. आता अभियान सुरु केल्यापासून (दि.३ पासून) आजतागायत ६४०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी ३० लक्ष रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या हंगामात एकूण आतापर्यंत ९३ हजार १०२ शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली.

जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचे नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केले. या मेळाव्यात पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूरीचे पत्रही देण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या