पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज सुरू , अद्ययावत शिक्षण सुविधांनी परिपूर्ण विद्यालय जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे – जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अकोला : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता सहावीत प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश चाचणी परीक्षा होणार असून, त्यासाठी दि. २९ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या विद्यालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवला जात असून, हे संपूर्ण निवासी व अद्ययावत शिक्षण सुविधांनी परिपूर्ण विद्यालय आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करून प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेशासाठी चाचणी परीक्षा दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या चाचणीला बसण्यासाठी ‘सीबीएसई आयटीएमएस. आरसीआयएल.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर दि. २९ जुलैपूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत शिकत असावा. तो अकोला जिल्ह्याचा रहिवाशी व या जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म दि. १.५.२०१४ ते ३१.७.२०१६ दरम्यान झाला असावा, अशी माहिती प्राचार्य कविता चव्हाण यांनी दिली.

या विद्यालयात संगणक, इंटरनेट, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदान, राहण्यासाठी कक्ष, नाश्ता, भोजन, स्वच्छ पेयजल आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी युनिफॉर्म, बूट, शैक्षणिक साहित्य विनामूल्य दिले जाते.

विद्यालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम, राष्ट्रीय विद्यार्थी सेना व इतर उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे, व्यायाम, योग व इतर कलांचे प्रशिक्षणही दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या