यात्रा व सणांच्या कालावधीत खाद्यपदार्थ नमुन्यांची तपासणी करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.८ : नजिकच्या काळात श्रावण महिना व लगोलग येणारे विविध धार्मिक सण उत्सव या कालावधीत अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडे अधिक काटेकोर तपासणी करावी, तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचीही तपासणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

सुरक्षित अन्न व आरोग्यदायक आहार सल्लागार समितीची आज जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक पार पडली. समितीचे सदस्य सचिव तथा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन द.वि. पाटील, डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, महिला व बालविकास विभागाचे आर.आर. भिमनवार आदी समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत (जानेवारी ते जून २०२५) करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. त्यानुसार, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे ४६ नमुने तपासणी साठी घेण्यात आले. ११ नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले.पनीरचे १८ नमुने घेण्यात आले त्यात २ नमुने असुरक्षित होते. ईट राईट इंडिया चॅलेंज अंतर्गत शाळा. महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांच्या कॅन्टीन सुविधांचे निर्जंतूकता गुणांकन करण्यात आले.उन्हाळ्यात शितपेये, उसाचा व फळांचा रस विक्रेते, खाद्य बर्फ विक्रेते, बाटलीबंद पाणी विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आले. १९ नमुने तपासण्यात आले त्यात १ नमुना असुरक्षित असल्याचे दिसून आले. आंब्यांचे नमुनेही घेण्यात आले. त्याचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण २५७ नमुने घेण्यात आले त्यात १५ नमुने असुरक्षित होते तर ४ नमुने हे बनावट होते. इतर अन्न पदार्थ तपासणी करण्यासाठी ३५८ तपासण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १९ प्रकरणांमध्ये १ लाख हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर ४५ प्रकरणे न्यायालयात निर्णयासाठी दाखल केले आहेत. सर्व्हेक्षण म्हणून ५५४ नमुने घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी द.वि. पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यालय सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचा विभागस्तरावर प्रथम क्रमांक आला. तसेच जिल्ह्यात इट राईट इंडिया चॅलेंज अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळ १ या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, अन्न पदार्थ विक्रेते यांना अन्न सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, आगामी काळात पावसाळ्याच्या दिवसात अन्न पदार्थ व पाण्यातून अन्न विषबाधा होण्याच्या घटना घडत असतात. तसेच अन्य संसर्गजन्य आजारही होत असतात. या कालावधीतच विविध सण, चार्तुमास, व्रत वैकल्ये आदी होत असतात. शिवाय धार्मिक यात्राही होत असतात. अशा ठिकाणी अधिक कडक तपासणी करावी. खाद्यपदार्थ नमुने तपासून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. तसेच शाळा महाविद्यालयाच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांचे स्टॉल्सही तपासावे, जेणेकरुन भेसळयुक्त खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांच्या सेवनात येऊ नयेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या