शेतकऱ्यांनी तात्काळ अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार करावा – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी, दि. ०४ : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद व प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने अँग्रिस्टॅक योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०१४ रोजी या योजनेला मान्यता दिली आहे.
परंतु, परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्याप अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार केलेला नाही. यामुळे पीएम किसान योजना, पीक विमा योजना, दुष्काळी अनुदान, शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून अँग्रिस्टॅक ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हा क्रमांक घेतलेला नाही त्यांनी तातडीने नजीकच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा किंवा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh या संकेतस्थळावर स्वतः जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.




