परभणीप्रशासनमहाराष्ट्र

शांतता समितीची बैठक संपन्नहोळी व रमजान ईद शांतता व आनंदात साजरी करावी – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : येत्या शुक्रवारी होळी व आगामी रमजान ईद सणानिमित्त शहरात विविध जाती-धर्मांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा तसेच दोन्ही सण शांततेत व आनंदात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले. होळी व रमजान ईद हे सण शांततेत आणि साध्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त़्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. डंबाळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्ह्यात आगामी काळात हिंदू बांधवांचा होळी आणि मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हे सण साजरे केले जाणार आहेत. दोन्ही समाजातील नागरिकांनी सामाजिक शांतता व सलोखा राखत आपला सण साजरा करावा. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या दिवशी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात आगामी काळातील साजरे करण्यात येणारे सणही अत्यंत उत्साहात आणि शांततेने पार पाडावेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी दोन्ही समाजांनी होळी आणि रमजान ईद हे सण साजरे करताना एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. सामाजिक सलोखा टिकवून ठेवत एकतेचा आदर्श घालून देण्याचे त्यांनी आवाहन केले. दोन्ही सण साजरे करताना नागरिकांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि सामंजस्याने सण साजरे करावेत. या सणांदरम्यान शहरात होर्डींग्जच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचे टाळण्याचा प्रयत्न करावा. हे दोन्ही सण आनंदाने व उत्साहाने साजरे करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले.

होळी व रमजान ईद सण दोन्ही समाजाने सामंजस्याने साजरे करावेत. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. रंग भरून पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले.

बैठकीला सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अधिकारी, तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button