विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा मतदान प्रक्रियावरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी निपक्षपातीपणे आणि पारदर्शकतेने काम करावे असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व नोडल अधिकारी यांना दिले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, उपायुक्त जगदीश मिनीयार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील व सर्व नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते .
आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याबाबत सर्व काही नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याही मतदारसंघांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्था व निवडणूक संबंधित प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून दक्ष राहणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त गावडे यांनी सांगितले. आचारसंहितापालन करीत असताना वाहन, मनुष्यबळ, इतर व्यवस्था जिल्ह्याच्या ठिकाणी व विधानसभा मतदारसंघनिहाय केलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनाविषयीचा आढावा सादर करण्यात आला. सर्व नोडल अधिकारी आणि मतदारसंघातील यंत्रणा यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रोख रक्कम बाळगणे व त्याबाबतचे नियम,संवेदनशील मतदान केंद्र, तसेच तक्रारदारास तक्रार करण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा ॲप उपलब्धता याविषयी जाणिव जागृती करण्याचे निर्देशही श्री. गावडे यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष ,मनुष्यबळ कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष, मतदार मदत कक्ष इ.ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.