धाराशिव शहर सुरत चेन्नई महामार्गास चौपदरीकरण ने जोडावे – ओमराजे निंबाळकर
जिल्ह्यातील अपूर्ण महामार्ग पूर्ण व लातूर ते टेम्भुर्णी चौपदरीकरण करावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव जिल्हयातून प्रस्तावित असलेल्या सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचे भुसंपादन अंतीम टप्यात असून सदर महामार्गाकरीता संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा शासनाव्दारे सक्तीचे जमीन भुसंपादन कायद्याव्दारे करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गाकरीता संपादित झाली आहे असे सर्व शेतकरी थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे मावेजा घेण्यास तयार असून शासन मात्र सक्तेच्या संपादन कायद्याव्दारे मावेजा देण्याबाबतची प्रक्रीया पार पाडत आहे. या विषयी शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना या विषयी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानुसार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेबांनी मा. ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेवून सदर प्रकल्पाकरीता संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे व राज्यातील इतर प्रकल्पांना ज्या पध्दतीने मावेजा देण्यात आला आहे. त्या प्रमाणे जिल्हयातील शेतकऱ्यांना मावेजा देणेबाबत संबंधीतांना आदेशीत करणेबाबत पत्राव्दारे व प्रत्यक्ष भेट घेवून विनंती करण्यात आली आहे.
तसेच जिल्हयातील विविध महामार्गाच्या अनुषंगाने अपुर्ण असलेली कामे तात्काळ पुर्ण करणेबाबत विनंती करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख्याने सोलापुर-उमरगा महामार्ग क्र. 65 वरील अपुर्ण कामे वेळेत पुर्ण करणेबाबत तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 सोलापुर –धुळे महामार्गावरील धाराशिव शहरानजीक तेरणा इंजिनिअरींग कॉलेज ते येडशी टोल प्लाझा पर्यंत महामार्गावर उड्डान पुलावरती प्रकाश योजना तसेच शहरानजीक सर्व्हीस रोडची कामे पुर्ण करणे बाबत व तुळजापुर औसा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 या महामार्गावरील अपुर्ण कामे तात्काळ पुर्ण करणे बाबत विनंती केली आहे.
याच बरोबर धाराशिव शहरास सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गास बार्शी तालुक्यातील वैराग शहराजवळ चौपदीकरणाव्दारे जोडणीबाबत (35 कि. मी.) व लातूर – टेंभुर्णी व्हाया मुरुड – येडशी- पांगरी- बार्शी टेंभुर्णी आदी शहरांना व व्यापारी बाजार पेठांना राष्ट्रीय महामार्गाने जोडणेकरीता लातूर टेंभुर्णी (एनएच 548C और N H-63) या 165 कि. मी. लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण (फोर लेन) करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व महामार्गावरील कामे तात्काळ मार्गी लावणेबाबत मा. मंत्री महोदयांनी अश्वस्थ केल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे. सदर कामाच्या अनुषंगाने नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे.