वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) नेते निरंजन प्रकाश भूमकर यांची निवड करण्यात आली आहे.सोमवारी या निवडीचे पत्र जाहिर होताच त्यांचे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीवरून सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांसाठी जिल्ह्यातील सहा जणांना निमंत्रित करण्याचे आदेश नियोजन विभागाचे उपसचिव नि . भा . खेडकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन प्रकाश भूमकर यांचा समावेश केल्यामुळे बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नक्कीच बळ मिळणार आहे.
यापुर्वीही महाविकास आघाडी कडून भूमकर यांना संधी देण्यात आली होती, आता महायुतीमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरंजन भूमकर यांच्यावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा शिफारस केली आहे. वैराग नगरपंचायत ही राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात असून सध्या स्वतः निरंजन भुमकर हे उपनगराध्यक्ष आहेत.