सामाजिक न्याय समता पर्व अंतर्गत रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी 25 हजार घरे मंजूर करण्याचा निर्णय
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम : आज 3 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा जात पडताळणी समिती, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय समता पर्व अंतर्गत रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी 25 हजार घरे मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे तसेच सामाजिक समता पर्वामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणे याबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार होते. समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवार, सहाय्यक गटविकास अधिकारी (पंचायत) उदय जाधव,कार्यालय अधिक्षक श्रीमती किरण तायडे, श्रीमती रंजना साठे, रमाई घरकुल योजना लाभार्थी सुधीर पवार, श्रीमती गंगाबाई इंगळे यांची उपस्थिती होती.
पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.गटलेवार यांनी रमाई आवास योजनेबाबत सविस्तर माहिती देवून काही अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. प्रस्ताविकेतून समाज कल्याण निरीक्षक आर.ए.शिरभाते यांनी रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी 25 हजार घरे मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करणेबाबत कार्यशाळा आयोजित केलेली आहे. अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत घटकांमध्ये निवारा हा महत्वाचा भाग आहे असे सांगितले.
वाठ यांनी लाभार्थ्यांना या योजनेबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित लाभार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण केले. श्री. तोटेवार व श्री.जाधव यांनी रमाई आवास योजनेचा लाभ मातंग समाजाच्या प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा याबाबतच्या नियोजनामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घरकुल मंजूर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे आभार व्यक्त केले. श्रीमती रंजनाबाई वाघमारे यांनी गीत गायन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे घरे कसे सुधारले याबाबत सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम कार्यालयाचे आर.टी.चव्हाण यांनी केले. आभार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम कार्यालयाचे हरीष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, व्यवस्थापक अनिल गायकवाड, व सर्व ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.