छत्रपती संभाजीनगर नावाने मनपाचा पहिला अर्थसंकल्प सादर
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासला जोडण्यासाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी भागात नवा उड्डाणपूल बांधणे, शहर सौंदर्यीकरणासाठी पहिल्यांदाच ५ कोटींच्या निधीची तरतूद, मेल्ट्रॉनमध्ये विविध आरोग्य सुविधा अशी ठळक वैशिष्ट्ये असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प आज प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सादर केला.
डॉ. चौधरी यांनी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) २०२३-२४ या वर्षाचा ३ हजार ८१ कोटी ८९ लाख १२ हजार रुपये जमा तर तीन हजार ८० कोटी ७२ लाख ८५ हजार खर्च असे १ कोटी १६ लाख २७ हजार शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. त्यात ७३८ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश असून, २९३ कोटी ५० लाख रुपयांची स्पीलची कामे आहेत. महापालिकेचे सुमारे दीड हजार कोटींचे स्वतःचे उत्पन्न अपेक्षित आहे तर उर्वरित निधी हा विविध अनुदानापोटी शासनाकडून मिळेल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
शहर असेच सुंदर राहावे, यासाठी पहिल्यांदाच सौंदर्यीकरण हे नवे हेड तयार करण्यात आले. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक कामे झालेली नव्हती, त्यामुळे २९३ कोटी ५० लाखांची स्पीलची कामे यंदाच्या बजेटमध्ये टाकण्यात आली आहेत. स्पीलच्या कामासह वर्षभरात ७३८ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च देखभाल दुरुस्तीवर होणार आहे.
१०० कोटींच्या रस्ते कामाची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही कामे यंदाच्या बजेटमध्ये घेण्यात आली आहेत. उत्पन्नाच्या बाजू सांगताना डॉ. चौधरी म्हणाले, की जीएसटीच्या अनुदानापोटी महापालिकेला शासनाकडून महिन्याला ३२ कोटी ५० लाखांचे अनुदान मिळते. वर्षभरात ३९० कोटी रुपये अपेक्षित असून, मुद्रांक शुल्काच्या एक टक्क्यापोटी ३५ कोटी रुपये महापालिकेला मिळतील.
मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये चालू तर १५० कोटी रुपयांची थकबाकी असे ३५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठरविले आहे. नगर रचना विभागामार्फत २३५.६० कोटी, गुंठेवारी अंतर्गत ५० कोटी तसेच पाणीपट्टीची चालू मागणी ८० कोटी तर थकबाकीपोटी ५० कोटींची वसुली अपेक्षित असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.