पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन; रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : राज्यातील भाजपच्या जुन्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना आज सकाळी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होेते. १९७३ ला टेल्को कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मागील काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होती. मात्र काही तासांतच त्यांचे निधन झाले. गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते राजकारणात उतरले होते. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट १९९५पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.