शेतकऱ्यांनो काळजी करु नका जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे शेतक-यांना आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीची जिल्हाधि-यांकडुन पाहणी
नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविणार
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दिग्रस या तालुक्यात 17 व 18 व 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत काळजी न करण्याचे आवाहन केले. यावेळी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी आनंद देऊळगावकर, कृषी सहाय्यक व तलाठी सोबत होते. तलाठी व कृषी सहाय्यकांनी 30 टक्के पंचनामे पूर्ण केले असून पुढील 70 टक्के पंचनामे दोन दिवसात पूर्ण करावेत आणि अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. अहवाल प्राप्त होताच शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना यावेळी सांगितले. गहू, ज्वारी व आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी उमरखेड तालुक्यातील कुपटी गावातील श्यामराव ग्यानबाराव मोरे, नागपुर पळशी गावातील पवन गणेशराव देशमुख तसेच चुरमुरा येथील सुंदलाबाई मोतिराम जाधव यांच्या शेतातील नुकसान झालेल्या गहु पिकाची पाहणी केली. तर अमनपुर येथील अशोक शिवराम वानखडे यांच्या शेतातील आंबा व पेरु पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याच्या शेतातही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली आणि शेतक-यांना धीर दिला.