शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील : अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

कृषि महोत्सवाचे थाटात उद्घाटन , कृषि महोत्सवाला शेतक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ : शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात अल्पकालीन व दिर्घकालीन योजनांचा समावेश असुन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आणि गावात समृद्धी यावी यासाठी शासन काम करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आत्मा प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते समता मैदान येथे आज पार पडले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शंकरराव गडाख, पोलीस अधीक्षक डॉ. पवन कुमार बनसोड, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. उंदीरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर प्रमोद यादगिरवार, डॉक्टर एन डी पार्लावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्मा नियामक मंडळ सदस्य रेणुताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या अर्थसंकल्पात शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्यात सवलत देण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना यापुढे पीक विमा काढता येईल. शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम शासन भरणार आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे आजपर्यंत कोणत्याही सरकारने नुकसान भरपाई दिली नव्हती. यावर्षी पहिल्यांदाच राज्यात ७०० कोटी रुपये तर जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाने दिली आहे. ठिंबक सिंचनसाठी आतापर्यंत केंद्र सरकारचे अनुदान होते, ते कमी असल्यामुळे आता राज्याने सुद्धा आपला वाटा त्यामध्ये देऊन सदर अनुदान ८० टक्के केले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने धान्य योजनेमध्ये समाविष्ट केले होते. आता त्याऐवजी वार्षिक प्रतिव्यक्ती १८०० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जिल्ह्यातील सिंचनाचे सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर विजेच्या पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास करायचा आहे असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांची तसेच कृषी पूरक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी कृषी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात कृषि विभागाच्या विविध योजना तसेच अनेक कृषितज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.याचा शेतक-यांनी लाभ करुन घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी याप्रसंगी केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या महत्त्वाच्या कृषी उत्पादनातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर फळबाग व फुल शेती करणारे शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहेत. अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे आपण एक रिसोर्स बँक तयार केलेली आहे. त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती संपन्न करणाऱ्या शेतक-यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केलेला आहे .यामध्ये जवळपास १०० च्या आसपास शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रगत तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी जिल्हाभर पोचविण्याचे काम करायचे आहे. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. सोबतच शेतकऱ्यांना या माध्यमातून एकमेकांचे प्रयोग जाणून घेण्याची, एकमेकांची अनुभव समजून घेण्याची संधी उपलब्ध होते आहे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भरडधान्य पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात तर महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहणे केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या