आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत – नरेंद्र पाटील

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ व्यवसाय, उद्योग उभारण्यास इच्छुक मराठा समाजातील युवकांना मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. महामंडळाच्या योजनेंतर्गत कर्जवाटपाबाबत बँक प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, पुणे शहर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, सहकारी बँकांकडून महामंडळाच्या कर्ज व्याज परताव योजनेंतर्गत कर्जवाटपाचा बँकनिहाय आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकांनी अपेक्षित कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नसून आगामी आर्थिक वर्षामध्ये नियोजनबद्धरित्या या योजनेचा प्रचार- प्रसार बँक शाखास्तरावर करावा तसेच कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. महामंडळाने छोट्या स्वरुपातील व्यवसायासाठी २ लाख रुपयांचे कर्जाची योजना जाहीर आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याबाबत योजनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कर्जवाटपासाठी आवश्यक सिबील स्कोअर बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास संस्था, आरसेटी आदी संस्थांसोबत करार करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज योजनेची मर्यादा १० लाख रुपयांवरुन १५ लाख रुपयांपर्यंत व कर्जपरत फेडीचा कालावधी ७ वर्षापर्यंत वाढविला असून ४ लाख ५९ हजार रुपयांपर्यंत व्याजपरतावा देण्यात येतो. त्याचबरोबर किमान दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना गटाने एकत्र येऊन व्यवसाय, उद्योगासाठी गट प्रकल्प व्याज परतावा योजनाही राबवण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्यासह मराठा संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, सहकारी बँकांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या