राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा व भरपाई द्या..शंकर गायकवाड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी/सोलापूर : एल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून चालू खरिपातील पिके अनेक जिल्ह्यामध्ये पावसाअभावी करपू लागल्यामुळे राज्यातील शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त व हताश होऊन खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकावरून नाविलाजाने मोगडा, कुळव व रोटर फिरवत असल्याचे सोशल माध्यमावर अनेक जिल्ह्यातून आढळून आलेले आहे तसेच हे प्रमाण वरचेवर प्रचंड वाढल्याचे ही दिसून येत आहे.
असेच प्रकार वानेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे दिसून आल्यानंतर शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड यांनी त्या शेतावर जाऊन पाहणी केली व आंदोलनाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मागील व चालू पिक विमा आणि नुकसान भरपाई देण्यास भाग पाडण्यासाठी लढा उभा करू असा धीर देत शेतकऱ्यांचे सांत्वन केले.
त्यावेळी गायकवाड यांनी सर्वच पिकविमा कंपन्यांनी त्यांचे स्थापनेपासून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केली असल्याचे सांगून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांचेसह सर्व कंपन्यांची स्थापनेपासून न्यायालयीन चौकशीची मागणी करत या चालू खरिपाच्या नुकसानीचे विमा कंपन्या व सरकारने पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा लवकरच महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून व विविध संबंधित कार्यालयांसमोर आंदोलने करतील असा इशारा गायकवाड यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
त्यावेळी प्रशांत यादव, सर्जेराव यादव, हनुमंत गरदडे, विकी गरदडे, लक्ष्मण लावंड, गणेश लावंड, आबा लावंड, ओम यादव, कृष्णा यादव, योगेश यादव, बिभीषण जोडवे, श्रीहरी यादव, गणेश यादव आदींसह शेतकरी उपस्थित होते.





