डॉ. राहुल पालके यांच्या शैक्षणिक यशाबद्दल खासदार पवन राजेनिंबाळकर यांच्याकडून अभिनंदन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांनी जून २०२६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) लोकसाहित्य विषयात यश संपादन करून नेट, सेट आणि गेट परीक्षांमध्ये उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीबद्दल धाराशिवचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
डॉ. पालके हे इंग्रजीत १२, मराठीत २ , हिंदीत २ वेळा उत्तीर्ण असून वुमेन स्टडीज, तुलनात्मक साहित्य, भाषाशास्त्र अर्थशास्त्र, आदिवासी साहित्य व भाषा या विषयांत प्रत्येकी १ वेळा उत्तीर्ण झालेले आहेत.
नेट, सेट आणि गेट परीक्षा तब्बल २२ वेळा उत्तीर्ण होण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, मेहनत आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
अभिनंदनपर पत्रात खासदार राजेनिंबाळकर यांनी डॉ. पालके यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व साहित्यिक कार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
डॉ. राहुल पालके यांच्या या यशाबद्दल शिक्षण, साहित्य क्षेत्र तसेच विद्यार्थीवर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या विक्रमी शैक्षणिक कामगिरीमुळे बार्शीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





