बाणेगाव येथे ई-पिक पाहणी (DCS) कामकाजाची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी
शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करताना येणाऱ्या अडचणींची केली पडताळणी; महसूल यंत्रणेला आवश्यक सूचना
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : मौजे बाणेगाव येथे आज, दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी ई-पिक पाहणी (DCS) कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केली. सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची पडताळणी करून ई पीक पाहणीचे काम अत्यंत प्रभावीपणे करण्याबाबत निर्देशित केले.
यावेळी ई-पिक पाहणी प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांकडून पीक नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या तसेच आवश्यक मार्गदर्शन याबाबत माहिती घेण्यात आली. ई-पिक पाहणीची नोंद अचूक व वेळेत होणे महत्त्वाचे असल्याने महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.
यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पीक पाहणी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच शेतकरी उपस्थित होते.पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई-पिक पाहणीचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची नोंद करताना पिकांची माहिती अचूकपणे नोंदवावी आणि काही तांत्रिक अथवा अन्य अडचण उद्भवल्यास संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची अचूक माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि महसूल यंत्रणेचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.





