बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांचा अभिनव उपक्रम – “बेस्ट पोलीस ऑफ द मंथ” व “बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ” पुरस्कार सुरू
B1न्यूज मराठी नेटवर्क 
बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात प्रथमच “बेस्ट पोलीस ऑफ द मंथ” आणि “बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करून त्यांना अधिक जोमाने व प्रेरणेने काम करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. गुन्हे उघडकीस आणणे, प्रतिबंधात्मक कारवाया, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, जनतेशी सुसंवाद ठेवणे, तक्रारींचे प्रभावी निराकरण करणे तसेच समाजहिताची उल्लेखनीय कामगिरी या निकषांच्या आधारे दर महिन्याला उत्कृष्ट कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
जुलै २०२६ या महिन्यासाठी “बेस्ट पोलीस ऑफ द मंथ” म्हणून पोलीस हवालदार अरुण अंबादास डुकळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्यांची निर्गती, दारूबंदी कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाया तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली.
तसेच “बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ” म्हणून पोलीस पाटील शंकर उत्तम गायकवाड (पाथरी) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी गावातील सामंजस्य राखणे, समन्स व वॉरंट बजावणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, दुय्यम गुन्ह्यांमध्ये सहकार्य करणे तसेच पोलीस प्रशासनाला दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
हा उपक्रम दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असून, निवड झालेल्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांचा १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि १ मे (महाराष्ट्र दिन) यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या दिनी नामांकित व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे पोलीस दलात निरोगी स्पर्धा निर्माण होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांचा सन्मान होईल आणि नागरिकाभिमुख पोलीसिंगला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. अक्षय सोनवणे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा उपक्रम पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण कामाला प्रोत्साहन देणारा आणि जनतेचा पोलीसांवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरणार आहे.





