बार्शी उपसा सिंचन योजनेचे ऐतिहासिक यश : कोरफळे शिवारात अखेर उजनीचे पाणी; आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते जलपूजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. ८ ऑगस्ट : अवर्षणग्रस्त बार्शी तालुक्याला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा-१’ अंतर्गत उजनी धरणाचे पाणी कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत यशस्वीरित्या पोहोचले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत यांच्या हस्ते कोरफळे येथे भव्य जलपूजन सोहळा पार पडला. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर शिवारात पाणी दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर आमदार राऊत यांनाही भावनिक होताना पाहायला मिळाले.

समस्त कोरफळे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलपूजनानंतर ग्रामस्थांनी आमदार राऊत यांचा ‘पाणीदार आमदार’ म्हणून सत्कार केला.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “आजचा दिवस कोरफळे गावासाठीच नव्हे तर संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी ऐतिहासिक आहे. उजनीचे पाणी पंप हाऊसपर्यंत पोहोचले असून यामुळे २,५०० एकर शेतीला संजीवनी मिळणार आहे. हा केवळ पाण्याचा प्रवाह नाही, तर शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांचा प्रवाह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी दिलेल्या मान्यता व निधीमुळे हा प्रकल्प मार्गी लागला.”

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्या कामाचा खरा मोबदला आहे. बार्शी तालुक्याला ‘पाणीदार बार्शी’ करण्याचा आमचा संकल्प असून पुढील टप्प्यांतील कामेही याच वेगाने पूर्ण करू.”500या योजनेमुळे कोरफळे गावातील सुमारे २,५०० एकर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेती शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक वर्षे पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या भागाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

उपस्थित शेतकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, “५० वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. आमच्या आजोबा-वडिलांनी पाण्यासाठी संघर्ष केला. आज आमच्या शेतात उजनीचे पाणी आले आहे. आता स्थलांतर करावे लागणार नाही; आमची मुले गावात राहून शेती करतील.”

शेतकऱ्यांनी पुढे ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचेही आश्वासन दिले.

या प्रकल्पाच्या यशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच हा टप्पा पूर्णत्वास आल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, भाजप डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कौरव माने, दिपक रोंगे, यशवंत माने, वैभव शिंदे, जयसिंग परदेशी, श्रीमंत थोरात, प्रशांत कथले, किरण घुले, भैय्या बारंगुळे, नंदकुमार काळे, बबन गडदे, अंकुश मोरे, दयानंद गाडे, बाबासाहेब पाटील, हनुमंत जाधव, महादेव चिकणे, विकास पाटील, नाना पाटील, नामदेव पोकळे, वसंत दहीवडकर, संतोष मोरे, विनायक घोडके, पिंटू मिरगणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बार्शीच्या दुष्काळी भागासाठी आशेचा किरण ठरलेला हा प्रकल्प तालुक्याच्या कृषी आणि आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या