बार्शी बस आगारात 5 नवीन एसटी बसेसचे लोकार्पण; उर्वरित 15 बसेस लवकरच दाखल होणार – आमदार राजेंद्र राऊत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. 31 : बार्शीकरांच्या प्रवासाच्या सोयीसाठी बार्शी बस आगारात दाखल झालेल्या पाच नवीन एसटी बसेसचे लोकार्पण सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. या नवीन बसेसमुळे बार्शी परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, बार्शी हे व्यापारी, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि नागरिक एसटीने प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांपासून बसेस कमी पडत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत फेऱ्या अपुऱ्या ठरत होत्या. ही समस्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यातून आज पाच नवीन बसेस बार्शी आगारात दाखल झाल्या आहेत.
आमदार राऊत यांनी पुढे सांगितले की, आज पाच बसेस दाखल झाल्या असून उर्वरित 15 नवीन बसेसही लवकरच बार्शी आगारात दाखल होतील. एकूण 20 नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर बार्शी–सोलापूर, बार्शी–पुणे, बार्शी–मुंबई, बार्शी–तुळजापूर आणि बार्शी–पंढरपूर या प्रमुख मार्गांवर अधिक फेऱ्या सुरू करण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि नियमित सेवा मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन बसेस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून प्रवाशांच्या सोयीचा विचार करून तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी व सुरक्षित होणार आहे. विशेषतः विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे आमदार राऊत यांनी नमूद केले.
या लोकार्पण सोहळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती सौ. मिनाक्षीताई रोंगे, उपसभापती संतोष दादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समिती सदस्य किरण घुले, प्रशांत कथले, दीपक रोंगे, श्रीमंत थोरात, रामेश्वर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बार्शी बस आगारात नवीन बसेस दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण अधिक सक्षम होण्यास या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.





