विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात बार्शी एकवटली! दिल्ली हिंसाचाराच्या निषेधार्थ ऐतिहासिक कडेकोट बंद; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बार्शी बंदला शहरातील व्यापारी, विविध सामाजिक, राजकीय संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा तीव्र निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. विवेक गजशिव यांनी केले.
शहरात सकाळपासूनच बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता, पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन पार पडले. बंद यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शैक्षणिक विषयाशी संबंधित आंदोलन असल्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, या भूमिकेतून शाळा, महाविद्यालये, अत्यावश्यक सेवा आणि भाजी मंडई यांना या बंदमधून जाणीवपूर्वक वगळण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनाला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळाला.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तहसील कार्यालय परिसरात झालेल्या निषेध सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. तानाजी ठोंबरे, अनिरुद्ध नकाते, प्रहार जनशक्ती पक्षाच्या संजीवनी बारंगुळे, शिवसेनेचे नगरसेवक आकाश राऊत, नगरसेवक माहेदिमिया लांडगे, युवासेनेचे शहरप्रमुख अॅड. हर्षवर्धन पाटील, समता परिषदेचे नितीन भोसले, दलित पँथरचे स्वप्नील वाघमारे, विनोद जाधव आणि शरद बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

या आंदोलनात सोनाली गायकवाड, किरण भालशंकर, आकाश चाबुकस्वार, सचिन पालके, गौतम वाघमारे, प्रवीण आखाडे, सुनील बगाडे, सुभाष सरवदे, लक्ष्मण बगाडे, बाळासाहेब सरवदे, विजय शिंदे, पांडा समिंदर, पंकज खुने, अतिश बनसोडे, निखिल लंकेश्वर, बंटी शिंदे, यश खुने, सुमित खुरुंगळे, सूर्या मस्के, दिपक जानराव, यशपाल ननवरे, संदीप खुने, अजय शिंदे, मनोज शिंदे, शंतनू खुने, शुभम अलाट, सुहास भालेराव, दिपक कसबे, रोशन शिंदे, संकेत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
बार्शी बंद शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध संघटना, व्यापारी आणि नागरिकांच्या एकजुटीमुळे विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील हा लोकशाही मार्गाने दिलेला निषेध लक्षवेधी ठरला.








