अमरावतीच्या ज्ञानेशकन्या संत गुलाबराव महाराज पालखीचे बार्शीत स्वागत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा, विदर्भातून पंढरीच्या दिशेने पायी दिंड्यांचा प्रवास सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथेून पंढरीकडे निघालेल्या ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज पालखीचे बार्शीत स्वागत करण्यात आले. अलिपूर रोड येथील वायकुळे मळ्यात या पालखीत सहभागी वारकरी तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
परंपरेप्रमाणे ग्रामदैवत श्री भगवंताचे दर्शन घेऊन प्रज्ञाचक्षु संत गुलाब महाराज पालखी पंढरीकडे प्रयाण करते. चांदुर बाजार येथून निघालेली पालखी बार्शीत दाखल झाली. येथील स्व. बळीराम वायकुळे यांनी मागील ५० वर्षांपूर्वी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद देण्याची परंपरा सुरु केली. आता हा सेवेचा वारसा निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे , ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या परिवाराने पुढे नेला आहे. अलिपूर रोडवरील वायकुळे मळ्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात यावर्षी पालखीचे स्वागत तसेच किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविक यावेळी उपस्थित होते, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी पालखीचे प्रमुख श्यामनारायणदास चौबे महाराज , संतोष महाराज निंबाळकर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, समीर वायकुळे , पोलीस हवालदार अमृत खेडकर , उमेश ठोंबरे, विमल वायकुळे , दीपाली माने, बळीराम सातपुते , नितीन देवकते, पुजारी पांडुरंग कुलकर्णी , राजेंद्र भंडारी, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.





