पालकमंत्र्यांच्या नावाचा व आवाजाचा कथित गैरवापर; महावितरणचा ठेका मिळवण्यासाठी दबाव, बार्शीत गुन्हा दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. १७ : महावितरणच्या कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा व आवाजाचा कथित गैरवापर करून कार्यकारी अभियंत्यावर दबाव टाकल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरीष ताटे (रा. बार्शी) व त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महावितरणचे कार्यकारी अभियंता राकेश ज्ञानदेव मगर (वय ४३) यांनी याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बार्शी विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असून, बार्शी, माढा आणि करमाळा तालुक्यातील वीजपुरवठा, दुरुस्तीची कामे तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या कामांचे कोटेशन पद्धतीने वाटप करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.500फिर्यादीनुसार, २३ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता त्यांच्या अधिकृत मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव नवनाथ वळसे असल्याचे सांगत, “पालकमंत्री महोदय बोलणार आहेत,” असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख “मी जयकुमार गोरे बोलतोय” अशी करून माढा उपविभागातील बाह्यस्त्रोताचे काम कोणाला दिले आहे, अशी विचारणा केली. तसेच संबंधित काम विद्यमान ठेकेदाराकडून काढून ते शिरीष ताटे यांना देण्याच्या सूचना केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याच दिवशी सुमारे दोन तासांनी व्हॉट्सॲप व्हॉइस कॉलद्वारे स्वतःला शिरीष ताटे म्हणून ओळख देणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधून, “पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काम मला द्या,” अशी मागणी केली. मात्र, पालकमंत्री अशा प्रकारे शासकीय कामासाठी शिफारस करत नसल्याची खात्री असल्याने कार्यकारी अभियंता मगर यांनी संबंधित ठेक्यात कोणताही बदल केला नाही. त्यानंतरही शिरीष ताटे याच्याकडून वारंवार व्हॉट्सॲप कॉल करून, “पालकमंत्र्यांनी सांगूनही काम दिले नाही तर तुमची पालकमंत्र्यांकडे तक्रार करून नोकरी घालवीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 600संशय आल्याने राकेश मगर यांनी स्वतः खातरजमा केली असता, शिरीष ताटे व त्याच्या अज्ञात साथीदाराने संगनमत करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा, पदाचा आणि आवाजाचा कथित गैरवापर करत लोकसेवक असल्याची खोटी बतावणी केली. तसेच धमकी देऊन शासकीय काम स्वतःकडे वळवून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी २३ जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाण्यात शिरीष ताटे व त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २०४, ३०८(२), ३१९(२), ६२, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या