बार्शीतील आरटीई प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा पर्दाफाश; २५ संशयित प्रवेश रद्द करण्याचे संकेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्याची प्रशासनाची ग्वाही
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील सुयश विद्यालय तसेच तांदुळवाडी येथील सुयश विद्यालयातील आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पात्र विद्यार्थ्यांना डावलून अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार एफ. आर. शेख यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, तपासणी पथक व पालकांची संयुक्त बैठक घेतली.
आरटीई अंतर्गत झालेल्या ७८ प्रवेशांपैकी सुमारे २५ प्रवेश हे बनावट भाडेकरार व संशयास्पद आधारकार्डांच्या आधारे झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याची माहिती बैठकीत समोर आली. शाळेजवळील वास्तव्य दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला.
बैठकीत गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके यांनी संशयित व बोगस आढळलेल्या प्रवेशांची रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, तसेच प्रतीक्षा यादीतील पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. तहसीलदार शेख यांनी तपासणी पथकाकडे आरटीई नियम व निकषांबाबत सविस्तर विचारणा केली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे बैठकीत दिसून आले. शिक्षक शशिकांत चव्हाण व विलास काळे यांना नियमांविषयी विचारले असता, “आम्ही फक्त तपासणी करतो, नियमांची माहिती नाही,” असे उत्तर त्यांनी दिल्याने उपस्थित पालकांनी नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणात तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली असून उर्वरित प्रवेशांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी पालकांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार शेख यांनी नियमांच्या चौकटीत राहून अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.





