लोकोपयोगी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना मदत करणार – पालकमंत्री ना. संजय राठोड
जिल्ह्यातील सामाजिक संस्थांसोबत बैठक व सविस्तर चर्चा
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांसमवेत आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी बैठक घेवून विविध महत्त्वपूर्ण विषयांची सविस्तर चर्चा केली. यावेळी लोकोपयोगी कार्य करणाऱ्या सामिजक संस्थांना मदत करण्याची शासन- प्रशासनाची भूमिका आहे. सामाजिक संस्थांनी आपले कार्य सुरु ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले.
पालकमंत्री ना. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे सामाजिक संस्थांसोबत समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, आमदार राजू तोडसाम, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे संचालक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. राठोड यांनी सामाजिक संस्थांच्या मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी नेमण्याचा आले आहे. सामाजिक संस्थांना ज्या शासकीय योजनांचा लाभ देता येतो तो तत्काळ दिला जाईल. सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचे प्रश्न, अडचणी सोडविणे हे आमचे काम आहे, त्या सोडविल्या जातील. मागण्यांच्या निवेदनांवर काय कार्यवाही झाली याची माहिती दिली जाईल. याबाबत दर महिन्याला आढावा घेतला जाईल. लोकसहभागाने नावीण्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याची आमची भूमिका आहे. सामाजिक संस्थांनी लोकोपयोगी कामे सुरु ठेवावे, शासन- प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, असे त्यांनी आश्वस्थ केले.





