कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा -पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन, खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन, दुष्काळ तयारी, बी-बियाणे, खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित आहेत.त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून योजनांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व तयारी २०२६ आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा शिंदे तसेच कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती भाऊसाहेब खरसडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की,कृषी विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषीविषयक ॲप विकसित करून शेतकऱ्यांना त्यात सहभागी करावे.यामुळे पारदर्शकता वाढेल आणि योजनांची माहिती अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल.हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असून पर्जन्यमान कमी राहू शकते.परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.त्यामुळे आतापासूनच व्यापक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाई, उशिरा होणारा पाऊस आणि संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनाने जनजागृतीसह उपाययोजनांची पूर्वतयारी ठेवावी,असेही त्यांनी सांगितले.राज्य शासनाने ३०० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून पुढील वर्षी जिल्हा नियोजन समिती निधीतून यासाठी तरतूद केली जाईल. वृक्षलागवडीसाठी आवश्यक रोपे जिल्ह्यातच तयार व्हावीत,नर्सरी उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि यासाठी ठोस आराखडा तयार करावा,अशा सूचनाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या.
आमदार कैलास पाटील यांनी प्रत्येक गावात कृषी विभागाचे ‘चावडी वाचन’ झाले पाहिजे,अशी भूमिका मांडली.यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला,याची पारदर्शक माहिती गावपातळीवर उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी किट,वेळेत निविष्ठा,पेरणीविषयक मार्गदर्शन आणि १०० टक्के बीज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाने पार पाडावी,असे त्यांनी सांगितले.बहुवार्षिक पिकांसाठी शेततळे योजनेचे प्रभावी नियोजन करून निधी उपलब्ध करून द्यावा,अशीही मागणी त्यांनी केली.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मार्च ते मे या कालावधीत घटणारा पाणीसाठा आणि संभाव्य दुष्काळी स्थितीवर आतापासूनच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची योजनानिहाय माहिती उपलब्ध करून दिल्यास लाभार्थ्यांवर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल,असे त्यांनी सांगितले.
आमदार प्रवीण स्वामी यांनी कृषी विभागाच्या माहिती प्रसारणातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित असल्याचे नमूद केले.वंचित शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोकरा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. संबंधित गावांतील एकही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही,यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोरे यांनी खरीप हंगाम २०२६ संदर्भातील सविस्तर माहिती सादर केली.त्यांनी सांगितले की,६ लाख ५० हजार २९ हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख २९ हजार ८०८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून त्यात सर्वाधिक १ लाख २४ हजार १६३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा समावेश आहे.९५ हजार ६०० मे.टन खतांची मागणी करण्यात आली असून सध्या ५८ हजार ८५२ मे.टन खत उपलब्ध आहे. उर्वरित ३६ हजार ७४८ मे.टन खतांची आवश्यकता आहे.एनपीके खताचा सर्वाधिक वापर होत असल्याने ४२ हजार ४०० मे.टन एनपीके खतांची मागणी करण्यात आली आहे.युरिया व डीएपी खतांचा १२०३ मे.टन संरक्षित साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय सन २०२५ मधील पर्जन्यमान, मार्च २०२६ मधील अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानीचा आढावा,ऊस उत्पादनात एआयचा वापर,तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थी व वितरित निधी याबाबतची माहितीही बैठकीत मोरे सादर केली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी नियोजन,तंत्रज्ञानाचा वापर,योजनांची पारदर्शक अंमलबजावणी आणि संभाव्य दुष्काळावर उपाययोजना यांवर केंद्रित झालेली ही बैठक जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरली. प्रारंभी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजनांची माहिती व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन केले.





